Protected by Copyscape Online Plagiarism Detector

Thursday, August 19, 2010

गालबोट

रात्रीचे साधारण दोन वाजत आलेले होते...
‘बत्ती बुझाव’चा आदेश येऊन जवळजवळ तीस-चाळीस सेकंद होऊन गेले होते. सगळीकडे पुन्हा एकदा मिट्ट काळोख पसरला होता. मात्र माझ्या डावीकडचा पन्नास फुटांवरचा एक टेंभा अजूनही जळत होता. असं व्हायला नको होतं खरं... केवढा धोका होता असा टेंभा जळत ठेवण्यात! तिथे जाऊन पहावं की पुन्हा आपल्या खंदकात जाऊन लपावं? काय करावं??...
खंदकात लपल्यामुळे मला मिळणाऱ्या सुरक्षेपेक्षा तो एक टेंभा जळत राहील्यामुळे आमच्या आख्ख्या एअरफोर्स स्टेशनला असणारा संभाव्य धोका टाळणं जास्त महत्त्वाचं होतं. क्षणार्धात मी निर्णय घेतला आणि त्या टेंभ्याच्या दिशेनं पळायला सुरूवात केली. काही सेकंदांतच मी तिथे पोहोचलो. तिथे कुणीच नव्हतं. मी तसाच अजून थोडा पुढे पळत गेलो आणि...

---------------

ऑगस्ट, १९६५.

१९६२ साली वायूदलात भरती झाल्यापासून प्रथमच मला दोन महिन्यांची सलग रजा मिळाली होती. घरी सगळे नातेवाईक, अनेक दिवसांनी भेटलेली मित्रमंडळी यांच्यासोबत सुट्टीचा एक महीना कधी संपला कळलंच नाही.
ते ऑगस्ट महिन्याचे अखेरचे दिवस होते. घरात गणेशचतुर्थीची लगबग सुरू होती. मात्र गणपतीबाप्पा आपल्यासोबत रजा रद्द झाल्याची आणि ताबडतोब कामावर रुजू व्हावे असा आदेश देणारी तार घेऊनच आले. पाकिस्ताननं भारताविरुध्द युध्द छेडलं होतं. घरोघरी विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू असताना देशावर आलेल्या या संकटाचा सामना करण्याचा आम्हाला आदेश मिळाला होता.
ठरलेल्या मुहूर्तावर घरात आम्ही शांत चित्तानं श्रींची स्थापना केली आणि दुपारनंतर सर्व आप्तेष्टांचा निरोप घेऊन मी निघालो.
आधी बैलगाडी, मग एस.टी.बस, नंतर मीटर गेज रेल्वे आणि तिथून पुढे मेन लाईन रेल्वे अशी मजल दरमजल करत, दोन-अडीच दिवसांच्या प्रवासानंतर मी ५ सप्टेंबरला अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पोहोचलो. मी तेव्हा तिथल्या भारतीय वायूदलाच्या १८व्या स्क्वॉड्रनमध्ये ‘लीडिंग एअरक्राफ्ट्स्‌मन (एल.ए.सी.)’ या पदावर कार्यरत होतो. कुठे हरियाणातलं अंबाला आणि कुठे उस्मानाबाद जिल्ह्यातलं छोटंसं चार-पाच हजार लोकवस्तीचं आमचं पारा गाव! पण आता ते मागे पडलं होतं. घरच्या आठवणी दारात ठेवून सगळे आपल्या कर्मभूमीवर पुन्हा जमले होते.

अंबाल्याचा वायूदलाचा तळ तेव्हा सर्वात सुरक्षित मानला जायचा. मुळात हे ठिकाण अतिशय नियोजनबध्द होतं. शिवाय इथे ग्रीनफील्डमधे म्हणजेच थेट जंगलातच विमानं ठेवण्याची व्यवस्था होती. झाडीत पूर्ण लपल्याने शत्रूला विमानं सहजी दिसायची नाहीत. साहजिकच पाकिस्तानचा रोख अंबाला शहर आणि इथला सैनिकी तळ यांकडेच जास्त होता.
१९६५च्या युध्दात भारताकडच्या नॅट विमानांचा पाकिस्ताननं अतिशय धसका घेतला होता. आमच्या स्क्वॉड्रनला फक्त चारच नॅट विमानं मिळालेली होती. त्यामुळे सरहद्दीवर हल्ले करून परतलेल्या या विमानांची देखरेख करण्याचंच काम प्रामुख्यानं आम्हाला करावं लागायचं. कमीतकमी वेळेत विमानं पुन्हा जैसे थे करून पाठवावी लागायची. त्यासाठी सलग वीस दिवस आमचा मुक्काम ग्रीनफील्डमधेच होता.
सर्वात सुरक्षित असल्यामुळे अंबाल्याचा विमानतळ त्या भागातला सर्वात व्यस्त विमानतळही होता. शेकडो विमानांची रहदारी तिथे सुरू असायची. असं असूनही आश्चर्याची गोष्ट अशी की रात्रीच्या वेळी विमानाला उड्डाण करण्यासाठी किंवा उतरण्यासाठी तिथल्या धावपट्टीवर क्षणात उजळू शकणाऱ्या किंवा क्षणात विझवताही येणाऱ्या कायमस्वरुपी विजेच्या दिव्यांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे धावपट्टीच्या दोन्ही बाजूला डीझेलचे जाड वातीचे शंभर ते सव्वाशे टेंभे ठेवलेले असायचे. इतरवेळी सूर्य मावळल्यावर ते लावले जायचे आणि सर्व विमानांची उड्डाणं आटोपली की विझवून उचलून आणले जायचे. पण युध्दकाळात ते शक्य नव्हतं. दिवस बुडाल्यावर संपूर्ण अंधार (ब्लॅक आऊट) ठेवावा लागे. त्यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळेला आम्हा सर्वांना एक अतिरिक्त काम दिलं गेलं होतं.
धावपट्टीच्या दोन्ही बाजूला सत्तर-पंच्याहत्तर मीटर अंतरावर एक मनुष्य आडवा झोपू शकेल असे एकापुढे एक खंदक तयार केले गेले. त्यात आम्ही लपून बसायचो. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून एखादं विमान उड्डाण करतानाची किंवा उतरण्याची सूचना मिळाली की एकजण ‘बत्ती जलाऽऽव, बत्ती जलाऽऽव’ असं ओरडत धावपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत जायचा. ‘बत्ती जलाव’चा आदेश मिळाला की प्रत्येकानं आपापल्या खंदकातून बाहेर यायचं, पळत जाऊन हातातल्या काडेपेटीनं नेमून दिलेला टेंभा पेटवायचा आणि पुन्हा पळत येऊन खंदकात आश्रय घ्यायचा; विमान उडल्यावर किंवा उतरल्यावर ‘बत्ती बुझाऽऽव’चा पुकारा व्हायचा; तो ऐकताच पळत जाऊन जवळच्या खराब कापडाच्या आणि धाग्यांच्या पुंजक्यानं (कॉटन वेस्ट) टेंभा विझवायचा आणि पुन्हा पळत येऊन खंदकात लपायचं असे आदेश आम्हाला मिळाले होते. यादरम्यान आम्हाला धोका होता तो परिसरात अकस्मात उतरू शकणाऱ्या शत्रूच्या पॅराटृपर्स्‌ पासून. म्हणून स्वसंरक्षणार्थ आम्हाला प्रत्येकी ३०३ची एक एक रायफल आणि दहा गोळ्यांचं एकएक मॅगेझिन दिलेलं होतं.
दिवसभर ज्याची त्याची नेमून दिलेली कामं आणि रात्री सर्वांना हे काम... या सगळ्यात खानपान, विश्रांती यासाठी पुरेसा वेळही मिळायचा नाही. बऱ्याचदा तर असंही व्हायचं की ‘रेड ऍलर्ट’चा सायरन वाजायचा आणि भटारखान्यातला स्वयंपाक अर्धवट टाकून आमच्या आचाऱ्यांनाही पळावं लागायचं. अशा वेळेला चुलीवरच्या भाज्या पार जळून जायच्या, कुणालाच धड जेवायला मिळायचं नाही. पण असं असलं तरी आमची कुणाचीच त्याबद्दल काहीही तक्रार नव्हती.
इतकं असूनही काम करत असताना आम्हाला सतत हे जाणवायचं की आपला युध्दातला सहभाग अप्रत्यक्ष आहे. कारण धोक्याच्या अनेक सूचना होऊनसुध्दा पाकिस्तानचं एकही विमान अंबाल्यापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. या आमच्या जाणीवेला तडा गेला तो १८ आणि २० सप्टेंबर या दोन दिवशी.

१८ आणि २० सप्टेंबरच्या रात्री एक ते तीनच्या दरम्यान पाकिस्तानी विमानांनी अंबाल्यावर बॉम्बफेक केली. एकून बारा बॉम्ब टाकले गेले. त्यांपैकी एक चर्चवर, एक हॉस्पिटलवर, एक ऑफिसर्स मेसच्या बागेत, एक आमच्या रेशन स्टॅन्डवर आणि एक एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या इमारतीवर असे एकूण पाच बॉम्ब फुटले.[*] बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडने फुटू न शकलेले बाकीचे सात बॉम्ब दगड गोळा करून आणावेत तसे गोळा करून आणून ठेवले. ते निकामी करण्याची निराळी गरजच नव्हती कारण ते निकामी अवस्थेतच टाकले गेले होते.[**] सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही पण तरी आता आमच्या मनात धास्ती बसली. अंबाल्याची अशी कुरापत पाकिस्तानला पुन्हा काढू देणं परवडण्यासारखं नव्हतं. नॅट विमानांचा आता अजून अधिक परिणामकारक वापर करावा लागणार होता.
नॅट विमानं हलकी असल्यामुळे अगदी कमी जागेत झपकन्‌ वळू शकायची. त्यांना हवी ती दिशा देणं इतर विमानांच्या तुलनेत अतिशय सोपं होतं. पण ती विमानं नाईट फायटर नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुचकामी ठरायची. रात्रीच्या वेळेला गस्त घालण्याचं अथवा हल्ले करण्याचं काम हंटर किंवा तूफानी या जातीची विमानं करायची. मात्र या बॉम्बहल्ल्यानंतर आमच्या वैमानिकांनी रात्रीच्या वेळेला गळ्यात दोन सेलची छोटी बॅटरी लटकवून कॉकपिटमधलं समोरचं इन्स्ट्रुमेंट पॅनल तेवढं फक्त दिसेल अशा बेतानं नॅट विमानांचीही गस्त सुरू केली.

... ती २१ सप्टेंबरची रात्र होती.
आम्ही सर्वजण आपापल्या खंदकात लपलो होतो. रात्री दीड वाजता आमचं जेवण आलं. जेवणाच्या वेळांची अनिश्चितता आता अंगवळणी पडली होती. जेव्हा जे समोर येईल ते खाऊन घ्यायचं याची सवय मात्र प्रत्येकानं लावून घेतली होती.
३-४ पोळ्या आणि त्यावर थोडी भाजी असं दिलं गेलेलं जेवण डाव्या हातावर घेऊन मी जेवायला सुरूवात केली. जेमतेम एखादी पोळी खाऊन झाली असेल आणि इतक्यात ‘बत्ती जलाऽऽव’चा पुकारा ऐकू आला. मी हातातल्या पोळ्या तश्याच पटकन्‌ बाजूला ठेवून दिल्या, पळत जाऊन मला नेमून दिलेला टेंभा पेटवला आणि पुन्हा पळत येऊन खंदकात आश्रय घेतला. परतल्यावर गुडूप अंधारातल्या गवतात माझं जेवण मला कुठे सापडेचना. जास्त शोधाशोध करण्यात अर्थ नव्हता कारण दरम्यान एक विमान उतरलं आणि पाठोपाठ ‘बत्ती बुझाऽऽव’चा आदेश आला.
मी धावत जाऊन माझा टेंभा विझवला आणि मागे वळलो. इतक्यात माझ्या डावीकडचा पन्नास फुटांवरचा एक टेंभा तसाच जळत असलेला मला दिसला...
असं व्हायला नको होतं खरं... केवढा धोका होता असा टेंभा जळत ठेवण्यात! तिथे जाऊन पहावं की पुन्हा आपल्या खंदकात जाऊन लपावं?... काय करावं?? खंदकात लपल्याने मला मिळणाऱ्या सुरक्षेपेक्षा तो दिवा सुरू राहील्यामुळे आमच्या आख्ख्या एअरफोर्स स्टेशनला असणारा संभाव्य धोका टाळणं जास्त महत्त्वाचं होतं. क्षणार्धात मी निर्णय घेतला आणि त्या टेंभ्याच्या दिशेनं पळायला सुरूवात केली. काही सेकंदातच मी तिथे पोहोचलो. तिथे कुणीच नव्हतं. मी तसाच अजून थोडा पुढे पळत गेलो आणि...
तिथे जे दृश्य दिसलं त्यानं माझ्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला...

डाव्या हातात जेवण आणि उजव्या हातात मोडलेला घास अश्या अवस्थेतले, धडापासून फक्त शीरं वेगळी झालेले दोन वायूसैनिकांचे मृतदेह तिथे पडलेले होते. बघून काळजाचं पाणी पाणी झालं. नक्की काय झालं, ते दोघं हातातल्या जेवणासकट एकाच टेंभ्यापाशी काय करत होते काहीही कळायला मार्ग नव्हता.
मी मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरूवात केली. दरम्यान एकच टेंभा सुरू आहे हे पाहून सिक्युरिटीची एक गाडी तिथे येऊन पोहोचली. आम्ही दोन्ही मृतदेह गाडीत ठेवले आणि गाडी निघून गेली. मी पुन्हा माझ्या खंदकात येऊन लपलो. ज्या अवस्थेत ते दोन मृतदेह मला दिसले ते दृश्य डोळ्यांसमोरून जाईना. त्या सैनिकांच्या मृत्यूचं कारण न कळल्यामुळे मनाची अस्वस्थताही जाईना.
‘बत्ती जलाव, बत्ती बुझाव’चं आमचं काम पहाटे चार वाजता संपलं.

या अपघाताबद्दल दुसऱ्या दिवशी जे कळलं ते ऐकल्यावर डोकं सुन्न झालं. हरियाणाचे ते दोन सैनिक एकमेकांचे मित्र होते. त्या दोघांनी मिळून एकच टेंभा पेटवला. त्यावर कहर म्हणजे काही मिनिटांत तो विझवायला परत यायचंच आहे तर मागे खंदकाकडे एवढं अंतर पळत जायचंच कशाला असा अत्यंत आत्मघातकी विचार करून स्वतःजवळची पोळीभाजी खात ते त्याच्या पुढच्या न पेटवलेल्या टेंभ्याजवळ बसून राहीले! दरम्यान गस्तीवर गेलेलं एक हंटर विमान उतरताना धावपट्टीच्या मधोमध न राहता थोडं डावीकडे सरकलं (स्कीड झालं). धावपट्टीच्या शेजारीच बसून जेवणाऱ्या त्या दोघा सैनिकांना विमानाच्या ड्रॉपटॅन्कची जोरदार धडक बसली आणि ते दोघं जागेवरच गतप्राण झाले. अपघाताचं कारण कळल्यावर मन विषण्ण झालं...
दोनच दिवस आधी बॉम्बफेकीसारखी भीषण घटना घडूनसुध्दा त्यात कुणालाही आपले प्राण गमवावे लागले नव्हते पण त्यानंतर दोनच दिवसांत हा असा दुर्दैवी अपघात घडला. युध्दातल्या अनिश्चिततेचा अजून एक पुरावा आम्हाला मिळाला.

दिलेली आज्ञा तंतोतंत पाळली गेलीच पाहीजे या सैन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, केवळ बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळेच त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.
गटात न बसणाऱ्या शब्दावर जशी आपण फुली मारून टाकतो तशी नियतीनं त्या दोघांवर फुली मारून टाकली होती. कारण...
‘नभस्पर्शम्‌ दीप्तम्‌’ (टचिंग द स्काय विद ग्लोरी) हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या वायूदलात ते दोघं गटात न बसणाऱ्या शब्दाप्रमाणेच होते; त्या ‘ग्लोरी’लाच काळीमा फासणारं कृत्य त्या दोघांच्या हातून घडलं होतं...!

---------------

[१] अंबाला कॅन्टोनमेंट परिसरातल्या सेंट पॉल चर्चची या बॉम्बहल्ल्यात झालेली नासधूस आजही पहायला मिळते. (महाजालावरच्या संदर्भावरून)

[२] स्वतःकडच्या तयारीचा पूर्ण आढावा न घेता पाकिस्ताननं आततायीपणे युध्द सुरू केल्याचा तो परिणाम होता. त्या युध्दात पाकिस्तानकडून वापरली गेलेली बरीच शस्त्रास्त्रे, दारूगोळा हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते.

--------------------------------------------------------------------------------------------------------

(माझ्या सासऱ्यांचे वायूदलातले मित्र श्री. एम. एन. भराटे यांच्या आठवणींवर ही युध्दस्य कथा बेतलेली आहे.)

Wednesday, June 2, 2010

प्राक्तन

लोलाब व्हॅली, ‘फ्रुट बाऊल ऑफ काश्मिर’ असं ज्याचं सार्थ वर्णन केलं जातं तो काश्मिर खोऱ्यातला एक भाग. श्रीनगरच्या वायव्य दिशेला १३० वर्ग कि.मी. प्रदेशात पसरलेल्या या व्हॅलीचं ‘फळांची परडी’ हे नाव किती सार्थ आहे हे तिथे भेट देणाऱ्या तुरळक पर्यटकांच्या लगेच लक्षात येतं. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवी कुरणं, काश्मिरच्या वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या फळांच्या बागा, इथला शुध्द, स्वच्छ, निर्मळ निसर्ग बघणाऱ्याला एक प्रकारची मनःशांती देतो; एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. पण या प्रदेशाला आजपर्यंत अश्या प्रकारची प्रसिध्दी म्हणावी तेवढी मिळालेली नाही आणि त्याला कारण आहे त्याचं भौगोलिक स्थान. पाकिस्तानची सीमारेषा इथून अगदी जवळ आहे. त्यामुळे इथली कूपवाडा, तंगधर ही गावं पाकिस्तानी घुसखोरी आणि अतिरेकी कारवायांमुळेच जास्त चर्चेत राहिली आहेत.
१९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युध्दाच्या वेळी तर लोलाब व्हॅली म्हणजे एक धगधगतं कुंड होतं. त्या धगीच्या झळा सोसलेलं एक ठिकाण - दृगमुल्ला. तिथल्या भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स शाखेच्या ‘२३६, फील्ड वर्कशॉप’मध्ये इन्स्ट्रुमेंट विभागाचा प्रमुख म्हणून मला रुजू होऊन एक वर्ष होत आलं होतं. सैन्यांच्या चकमकीत, लढाईत वापरल्या गेलेल्या साधनसामुग्रीची - अगदी साध्या दुर्बिणीपासून ते पार मोटारी आणि तोफांपर्यंत - ठिकठिकाणी जाऊन तपासणी करणं, दुरुस्तीची गरज असल्यास त्यांची दुरुस्ती करणं, त्यांना पुन्हा एकदा युध्दसज्ज परिस्थितीत आणून ठेवणं हे आमचं मुख्य काम. आमच्या युनिटमध्ये एकूण तीनशेच्या आसपास तंत्रज्ञ होते. त्यांपैकी वर्कशॉपच्या जागी दीडदोनशे जण तरी हजर असायचेच. उरलेल्यांपैकी काहीजण सुट्टीवर गेलेले असायचे तर काहीजण पायदळाबरोबर सीमारेषेवर गेलेले असायचे. (सैनिकी भाषेत त्याला इन्फंट्री डिटॅचमेंट असं म्हणतात.)
वर्कशॉपच्या अवतीभोवती भाताची हिरवीगार शेतं होती. लांबवरचे सूचीपर्णी वृक्षांनी मढलेले उंचच उंच डोंगर बर्फ पडल्यावर फारच सुंदर दिसायचे. पण शेवटी तो सर्व परिसर म्हणजे एका जगप्रसिध्द शापित नंदनवनाचा भाग होता. हिंसाचाराचं गालबोट सावलीसारखं सतत त्याच्या पाठीशी होतं. अलौकिक सृष्टीसौंदर्यानं मोहून गेलेल्या कुणा मुसाफिराची वाहवा कानावर पडण्याऐवजी त्याच्या नशिबी होत्या धडधडणाऱ्या तोफा आणि मशीनगनच्या फैरी, घुसखोरांची कपट कारस्थानं आणि स्थानिक लोकांची भेदरलेली घुसमट...
आसपासच्या छोट्याछोट्या वस्त्यांमधून काहीजण आमच्याकडे काम मागायला यायचे. वर्कशॉपच्या भटारखान्यासाठी जंगलातून लाकडं तोडून आणणं किंवा आचाऱ्यांच्या हाताखाली वरकामं करणं अश्यासाठी मग त्यांची नेमणूक व्हायची. त्याबदल्यात त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची ददात मिटायची. त्यांना आम्ही पैश्यांची मदत मात्र कधीही केली नाही. त्यांचीही तशी अपेक्षा नसायची.
आमच्या वर्कशॉपपासून ५-६ कि.मी. अंतरावर कूपवाडा गाव होतं. तिथून पुढे ५-६ कि.मी. वर लोलाब व्हॅली आणि जवळच पाकिस्तानला भिडलेली भारताची वायव्य सरहद्द. तिथूनच पाकिस्तानी घुसखोर चोरवाटेनं आपल्या हद्दीत घुसत. सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीबद्दल गावकऱ्यांकडूनही कधीकधी महत्त्वाची माहिती मिळायची. **

ऑगस्ट महिन्याची १० तारीख... नारळीपौर्णिमेचा दिवस होता. त्यानिमित्त सकाळी आमच्या मंदिरात पूजाअर्चा पार पडली. (सैन्याच्या प्रत्येक छावणीत एकतरी मंदीर असतंच.) दुपारच्या जेवणात खीर-पुरीचा मस्त बेत होता. सुग्रास(!) जेवणाची चव जिभेवर घोळवत घोळवत दिवस कलायला लागला होता. आपापल्या घरांपासून हजारो कि.मी. दूरवर सर्वांनी अजून एक सण आठवणींसोबत साजरा केला होता.
आधीच्याच आठवड्यात काही पाकिस्तानी आपल्या हद्दीत घुसल्याची खबर स्थानिक लोकांकडून आणि आपल्या गुप्तहेरांकडून मिळालेली होती. वर्कशॉपवर सहसा त्यांचा हल्ला होत नसे. कारण त्यात त्यांना फारसा फायदा नसायचा. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त नुकसान करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं जे थेट पायदळावर हल्ला केला तरच साध्य व्हायचं. पण तरीही वर्कशॉपच्या चारही बाजूंनी खंदक खणून आम्ही आमच्या परीनं सज्ज झालेलो होतो.
त्यादिवशी संध्याकाळी एका शक्तिशाली दुर्बिणीतून जवळच्या एका डोंगरावरच्या झाडीत हालचाल दृष्टीस पडली होती. त्यावरून सगळ्यांनीच हे ताडलं होतं की आज काहीतरी होणार! जागा वर्कशॉपची असल्यामुळे आमच्याकडे शस्त्रं तरी काय, तर मोजक्याच मशीन गन्स्‌, रायफल्स्‌, स्टेनगन्स्‌ आणि जरूरीपुरती काडतुसं...
अंधार पडला, सामसूम झाली. लवकर जेवणं आटोपून सर्वांनी खंदकांत आपापल्या जागा घेतल्या...
रात्र वाढायला लागली. मिट्ट काळोख डोळ्यांत मावत नव्हता. रातकिड्यांची किरकीर, वाऱ्यानं हलणाऱ्या झाडांची-पानांची सळसळ, दूरवर जंगलात घुबडाचं ओरडणं यातून वाट काढत जीवघेणी शांतता कानांत घुसत होती. एक प्रहर असाच उलटला.
...आणि अचानक रात्री दीड-दोनच्या सुमाराला आमच्या दिशेनं गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. मशीनगनचेच आवाज होते ते. बंदुका चालवण्याचं आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण हे रात्रीच्या काळोखात तसं फारसं उपयोगी पडणारं नव्हतं. तरीसुध्दा आम्ही जमेल तसा प्रतिकार करायला सुरूवात केली. अर्धा तास दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू होता. तेवढ्यात आमच्या समोरच्या शेतात तोफेचा एक गोळा येऊन आदळला. कानांचे पडदे फाडणारा आवाज झाला. आगीचा प्रचंड मोठा लोळ उठला.
त्यांच्याजवळ केवळ मशीनगन्स्‌ नव्हत्या तर...!
तोफांसारख्या मोठ्या शस्त्रांचा मुकाबला आम्ही किती काळ करू शकणार होतो...? आमच्या वरिष्ठांची धावपळ सुरू झाली. पण वायरलेसवरून माहिती मिळाली की तोफेचे गोळे आमच्या संरक्षणासाठीच येत होते. वर्कशॉपपासून ३ कि.मी. अंतरावर आमच्या ब्रिगेडचं हेडक्वार्टर होतं. घुसखोरीची खबर मिळाल्यामुळे तिथून आलेल्या आज्ञेनुसार तोफखाना विभागामार्फत जवळच आमच्या मदतीसाठी अतिरिक्त तोफा तैनात केल्या गेलेल्या होत्या आणि गोळीबार सुरू झाल्यावर त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली होती. आपल्या रक्षणासाठी इतक्या जवळ इतक्या संख्येनं तोफा सज्ज आहेत हे तोपर्यंत आम्हा कुणालाच माहीत नव्हतं.
त्या तोफा पहाटेपर्यंत धडधडल्या. सकाळी सगळं शांत झाल्यावर आम्ही आजुबाजूच्या वस्त्यांत चौकशी केली असता घुसखोरांनी काही प्रेतं पायांना दोरी बांधून ओढत नेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं! तोफगोळ्यांनी आपलं काम केलं होतं. सुदैवानं आमच्या छावणीतलं कुणीही कामी आलं नव्हतं.

पाकिस्तानच्या अश्या सततच्या कुरापतींचं पर्यावसान शेवटी १९६५ सालच्या ‘प्रसिध्द’ लढाईत झालं. आपले तत्कालीन पंतप्रधान कै. लालबहाद्दुर शास्त्री यांची रेडियोवरून प्रसारित होणारी भाषणं ऐकून आम्हाला तेव्हा स्फुरण चढत असे.
अवघ्या काही आठवड्यांची धुमश्चक्री... आणि सप्टेंबरमध्ये यूनोनं हस्तक्षेप केला. २३ सप्टेंबरला लढाई अधिकृतरीत्या संपुष्टात आली. नैतिकदृष्ट्या भारताचा विजय झाला, पाकिस्तानचं नाक कापलं गेलं. जगाला दाखवायला पाकिस्ताननं यूनोचा युध्दबंदी प्रस्ताव विनाअट स्वीकारला.

कुठल्याही लढाईनंतरच वर्कशॉपवाल्यांचं काम खऱ्या अर्थानं वाढतं. तंगधर या सरहद्दीजवळ असलेल्या गावाबाहेर आपली शीख रेजिमेंट कार्यरत होती. तिथे मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीच्या कामांची आवश्यकता होती. म्हणून मी आणि माझे सहकारी इन्फंन्ट्री इन्स्पेक्शनसाठी तिथे गेलो होतो. कडाक्याची थंडी होती. पण स्वच्छ ऊनही पडलेलं होतं. आम्ही उन्हात मोकळ्या जागेत आमचं काम करत होतो. दरम्यान दूरवर गोळीबाराचे ध्वनी-प्रतिध्वनी ऐकू यायला लागले. कामांत व्यग्र असूनही ते आवाज आमच्या चेहऱ्यांवर प्रश्नचिन्हं उमटवून गेले. युध्दबंदीनंतर आता खरं म्हणजे गोळीबाराचं काहीही प्रयोजन नव्हतं. तिथले लोक मात्र हे रोजचंच आहे असं सांगत होते.
दुपारच्या जेवणानंतर आमचं काम पुन्हा सुरू झालं. आता गोळीबार अगदी जवळ ऐकू येत होता. युनोच्या निरिक्षकांच्या गाड्यांची धावपळही सुरू झाली होती. काम अर्धवट टाकायला लावून रेजिमेंटच्या लोकांनी आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवलं. जेमतेम दहा मिनिटं झाली असतील नसतील आणि... जिथे आम्ही सकाळपासून काम करत होतो त्या जागी पाकिस्तानच्या हद्दीतून एक डोंगरी तोफेचा गोळा येऊन पडला!! मोठा स्फोट झाला. तोफगोळ्याचे कितीतरी तुकडे आमच्या पायांजवळ येऊन पडले. तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शेवटी अक्षरशः एका गाडीत कोंबलं आणि वर्कशॉपकडे परत पाठवून दिलं.
युध्दबंदीच्या कराराचं उल्लंघन झालं होतं. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापत निघाली होती. सैनिकांनी पुन्हा एकदा बंदुका सरसावल्या होत्या. तोफा पुन्हा एकदा धडधडण्यासाठी तयार झाल्या होत्या. स्थानिक लोक पुन्हा एकदा जीव मुठीत धरून आपापल्या घरांच्या बंद दारांआड भेदरून बसले होते...

काश्मिर खोऱ्याचं मूकपणे अश्रू ढाळणं सुरूच होतं!!

------------------------------------

(माझ्या सासऱ्यांचे आर्मीमधले मित्र श्री. कमलाकर प्रधान हे १९६४ ते १९६८ या काळात काश्मिरमधल्या सीमाप्रदेशात लोलाब व्हॅलीजवळ कार्यरत होते. ही कथा त्यांच्या तिथल्या आठवणींवर बेतलेली आहे.

** वास्तविक हे घुसखोर म्हणजे प्रत्यक्षातलं पाकिस्तानी सैन्यच होतं. भारताच्या हद्दीत घुसून आपण काश्मिरी जनतेला चिथावणी देऊ शकू असा फाजील आत्मविश्वास त्यांना वाटत होता. ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावानं ओळखली जाणारी पाकिस्तानची ही मोहीम शेवटी पूर्णपणे फसली.)

Tuesday, March 9, 2010

रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...


पाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषांलगत आपल्या भारतीय सैन्याला हिमालय पर्वतानं युध्दकाळात नेहमीच वडीलकीच्या नात्यानं साथ दिली आहे. भारतीय सैन्याला त्याचा किती आधार वाटतो ते तिथे सतत जागरुक राहून काम करणारा एखादा सैनिकच जाणे. पण कधीकधी हाच हिमालय आपल्याच सैन्याला आपल्या रौद्र रूपाची, लहरी हवामानाची प्रचितीही देतो; युध्दकाळातल्या आणीबाणीसाठी तयार असणार्‍या सैनिकांना शांततेच्या काळातही बिकट प्रसंगांना तोंड द्यायला लावतो. अर्थात, आपले शूर सैनिक त्यातूनही शिताफीनं मार्ग काढतातच. शिवाय हिमालयाकडून मिळालेलं हे ‘कडक ट्रेनिंग’ सैनिकांना अधिक काटक, अधिक चिवट, अधिक धाडसी बनवतं आणि मग त्या ट्रेनिंगची ‘कथा’ ऐकताना सामान्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
असाच ‘कडक ट्रेनिंग’चा एक धडा आम्हाला मिळणार होता. मृत्यूच्या दाढेतून परत येणं या शब्दांचा खराखुरा अर्थ समजणार होता. एखादी व्यक्ती किंवा प्रसंग देवदूत बनून येतात म्हणजे नक्की काय होतं याची प्रचिती येणार होती. हिमालयाच्या साथीनं शत्रूवर वर्चस्व गाजवणं शक्य असलं तरी त्याच हिमालयासमोर आपण किती कःपदार्थ ठरू शकतो हे उमजणार होतं...
पण, १९६१ सालच्या मे महिन्याच्या एका संध्याकाळी दिवसभराचं काम आटोपून जोरहाटला जाणार्‍या विमानात थकून-भागून चढताना मात्र आम्हा सहाजणांपैकी कुणालाच याची कल्पना असणं शक्य नव्हतं...!
त्यादिवशी त्या ए.एल.जी.वर आम्ही दिवसभर तळ ठोकला होता आणि त्याला कारण होतं आमचंच एक बिघडलेलं विमान. ते दुरुस्त करण्यासाठी भल्या पहाटे ‘एअर टॅक्सी’च्या पहिल्याच फेरीला वैमानिकानं आम्हाला तिथे नेऊन सोडलं होतं. दिवसभराची त्याची कामं उरकून संध्याकाळच्या शेवटच्या फेरीला तो आम्हाला जोरहाटला परत घेऊन जाणार होता.
चार वाजून गेले होते. आमचं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. आमचा वैमानिक निघायची घाई करत होता. कारण सूर्य मावळायच्या आत विमान जोरहाटला पोहोचणं गरजेचं होतं. ‘ऑटर्स’च्या वैमानिकांना हे एवढं एकच पथ्य पाळावं लागायचं. बाकी आमच्या त्या ‘एअर टॅक्सी’ची दुसरी काहीही मागणी नसायची! आपापल्या डांगर्‍या (दुरुस्ती कामाच्यावेळी तंत्रज्ञांनी घालावयाचा पोषाख) झटकत आम्ही आमची अवजारं आणि इतर सामान आवरायला सुरूवात केली. आमचा गणवेष वापरायची आमच्यावर तशी कमीच वेळ यायची. काही कार्यालयीन काम असेल किंवा काही विशिष्ट प्रसंग असेल तरच गणवेष आमच्या अंगावर चढायचा. नाहीतर काम करायला सोयीची अशी ही डांगरीच आमची साथीदार असायची.
सर्व सामानासकट आमचा सार्जंट आणि आम्ही चौघं विमानात चढलो तेव्हा पावणेपाच वाजत आले होते. म्हणजे निघायला तसा उशीरच झालेला होता. तरीही योग्य वेळेत जोरहाटला पोहोचणं वैमानिकाच्या अगदीच आवाक्याबाहेरचं नव्हतं.
विमानानं उड्डाण केलं तसं दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यायच्या निमित्तानं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमचा वैमानिकही अधूनमधून संभाषणात भाग घेत होता. काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेलं असल्यामुळे एक प्रकारचं समाधान होतं. थकायला झालेलं असलं तरी आम्ही सगळे बर्‍यापैकी सैलावलो होतो.
विमानाच्या खिडकीतून दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. आसाम-अरुणाचल प्रदेशात वर्षभर हवा तशी पावसाळीच असते. त्यामुळे इकडे तिकडे पावसाचे ढगही तरंगत होते. विमानाच्या डावीकडे अगदी जवळ एक उंचच्या उंच डोंगरकडा होता. खाली घनदाट जंगल होतं. त्या गर्द हिरव्या जंगलाच्या मधोमध ‘ए.एल.जी’चा ठिपका लहान लहान होत चालला होता. दिवस मावळतीला आला होता. सूर्यही पेंगुळला होता. अजून अर्ध्या-एक तासातच त्या परिसरावर अंधाराचं साम्राज्य पसरणार होतं. त्यानंतर ते जंगल अजूनच भीषण वाटणार होतं. डोंगररांगा अजून भयाण होणार होत्या. दिवसभर जवानांची, विमानांची जिथे वर्दळ चालू असते ती ए.एल.जी.ची जागा अंगावर सर्रकन्‌ काटा आणणार्‍या रात्रीत मग शोधूनही कुणाला सापडली नसती. आम्ही मात्र त्यापूर्वीच जोरहाटच्या तळावर सुखरूप पोहोचणार होतो. निदान त्याक्षणीतरी त्याबद्दल काही शंका यावी अशी परिस्थिती नव्हती. पण पुढच्या पाच मिनिटांतच या निवांतपणाला जोरदार तडा जाणार होता...
आमच्या गप्पा चालू असताना अचानक वैमानिकानं मागे वळून आम्हाला सुरक्षा-पट्टे बांधायला सांगितले. आधी आम्हाला तो गप्पांच्या ओघात काहीतरी बोलतोय असंच वाटलं. पण पुढच्याच क्षणी तो काय सांगतोय ते आमच्या लक्षात आलं. आपापले सुरक्षा-पट्टे आवळता आवळता साहजिकच आमचं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. बघतो तर काय... डोंगररांगा, खालचं गर्द जंगल सगळं नाहीसं झालं होतं आणि नजर जाईल तिथपर्यंत काळ्या ढगांचं साम्राज्य पसरत चाललेलं होतं. वातावरण किती झपाट्यानं बदललं होतं! काही मिनिटांपूर्वीचं विहंगम दृष्य बघताबघता भूतकाळात जमा झालं. एक मोठा पावसाचा ढग आमच्या पुढ्यात उभा ठाकला होता आणि त्याला पार करून पुढे जाण्यासाठी वैमानिकाची धडपड सुरू झाली होती. ढगाच्या प्रभावामुळे अचानक वावटळ सुरू झाली आणि वार्‍याच्या जबरदस्त झोतामुळे आमचं विमान त्यात हेलकावे खाऊ लागलं - कधी उजवीकडे तर कधी डावीकडे! त्याचा जोर इतका असायचा की वैमानिकाला तिथल्या तिथे विमान ३६० अंशात वळवून परत मूळ दिशा पकडावी लागत होती. मध्येच विमानाची शेपटी अचानक इतकी वर ढकलली जायची की विमान वेगानं जमिनीच्या दिशेनं जायला लागायचं. पण वैमानिकावर आणि सुरक्षा-पट्ट्यांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्हाला आधी त्याची मजाच वाटली. एखाद्या मोठ्या ‘जायंट व्हील’मध्ये बसल्यावर जसे लहान-थोर सगळेच आरडाओरडा करत त्याची मजा घेतात तसाच आरडाओरडा आम्ही चालू केला. अचानक आमच्या सार्जंटकडे माझं लक्ष गेलं. जराश्या गंभीर चेहर्‍यानं तो उजवीकडच्या एका खिडकीतून एकटक बाहेर बघत होता. मी ही त्या दिशेला पाहिलं आणि चरकलोच! बाहेरचं आकाश अजूनच गडद झालं होतं. आम्ही सर्वांनी चपापून एकमेकांकडे बघितलं. प्रसंगाचं गांभीर्य आता आमच्या लक्षात आलं!
आता वावटळीचा जोर वाढला होता. ढग जरासा विरळ होतोय असं वाटलं की वैमानिक विमान आत घुसवे. पण अंतर्गत भागात इतका अंधार दाटलेला असायचा की तिथल्यातिथे मागे वळून परतावं लागे.
जास्त उंचीवर पावसाचे ढग अधिक दाट असतात. म्हणून वैमानिकानं विमान थोडं खाली घेतलं. पण तरीही तेच! मग त्यानं विमान अजून‌अजून खाली नेलं. पण ढगाचा पडदा भेदण्याचा त्याचा प्रयत्न पुनःपुन्हा अयशस्वी होत होता. विमान आता अति खालून धोकादायकरीत्या उडत होतं. खालचे झाडांचे शेंडेही दिसायला लागले होते. डावीकडचा उंच पर्वत ओलांडून पलिकडे जाण्याइतकी क्षमता आमच्या विमानात नव्हती आणि उजवीकडे खिडकीतून तो एकच एक आक्राळविक्राळ ढग क्षितिजापर्यंत पसरलेला दिसत होता. नाकासमोर सरळ जाण्याशिवाय वैमानिकाजवळ कुठलाच पर्याय नव्हता. ‘फोर्स लँडिंग’ करायचं तर खाली कुठेच शेत अथवा सपाट जमीन नव्हती. आता मात्र आमचं धाबं दणाणलं.
वार्‍याच्या तडाख्यामुळे विमान कोसळलं असतं तर एखाद्या झाडाच्या शेंड्यावर वेडंवाकडं अडकून बसलं असतं. अश्या वेळेला काहीही होऊ शकलं असतं... विमानाला आग लागली असती, इंधनाचा स्फोट होऊन सगळं खाक झालं असतं...
अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत आम्ही जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर येऊन पोहोचलो होतो. मृत्यू आपला दरवाजा सताड उघडा ठेवून जणू आमच्या सर्वांची वाट बघत होता. होता होईल तेवढं डोकं शांत ठेवून समोरच्या परिस्थितीला तोंड देणं इतकंच वैमानिकाच्या हातात होतं आणि त्याची सुटकेसाठी चाललेली धडपड बघत राहणं इतकंच मागच्या आम्हा पाचजणांच्या हातात होतं. आता आठवून आठवून मला आश्चर्य वाटतं की त्यादिवशी आमचा सार्जंट सर्वात जास्त घाबरला होता. वास्तविक आमच्या तुकडीचं तो नेतृत्व करत होता. सेवाज्येष्ठतेमुळे तसाही तो आमचा वरिष्ठच होता. पण एक विलक्षण योगायोग म्हणजे त्यावेळी घर-संसार-मुलंबाळं असलेला तो एकटाच होता. बाकीचे आम्ही चौघं अजून अविवाहित आणि त्यामुळे त्यादृष्टीनं सडेफटींग होतो. मृत्यू पुढ्यात उभा असताना त्याला त्याचे पाश मागून आकांतानं हाका मारत होते आणि त्या हाकांना ‘ओ’ देण्याची ताकद त्या रौद्रढगानं त्याच्यापासून हिरावून घेतली होती. भीतीनं जणू शक्तिपात झाल्यासारखा तो निश्चल बसून होता. मनातल्यामनात देवाचा धावा करत असावा बहुतेक... आणि अचानक आशेचा एक अंधुकसा किरण आम्हाला दिसायला लागला.
आसपास सोसाट्याचा वारा जोरानं घुमत होता पण त्यातच उजवीकडून, खूप उंचावरून येणारा विमानाचा एक क्षीणसा आवाज आमच्या जिवाच्या कानांनी टिपला! एक संधी... कळत नकळत... मदत मिळण्याची एक बारीकशी आशा... पण ती आशा आमच्यात एक प्रकारचं चैतन्य खेळवून गेली. खरंच एखादं विमान आपल्या दिशेनं येतंय का? आपण संकटात आहोत हे त्या विमानाला कळेल का? त्यांची मदत आपल्यापर्यंत पोहोचेल का?... जणू या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठीच आमच्या नजरा आता उजवीकडच्या खिडकीवर खिळल्या...
पुढच्या काही सेकंदांत लांब, उंचावर अजून एका विमानाची पुसटशी आकृती दिसायला लागली. म्हणजे आम्ही ऐकलेला आवाज खरंच एका विमानाचा होता. नशीबानं मृत्यूवर विजय मिळवायला सुरूवात केलेली होती! आता फक्त त्या विमानापर्यंत संदेश पोहोचवायचं काम आम्हाला करायचं होतं. एखादी आज्ञा मिळाल्यासारख्या आमच्या नजरा आता वैमानिकाकडे वळल्या. पण समोरच्या काळ्या राक्षसाचा सामना करण्यात तो इतका गर्क होता की अजून त्या दुसर्‍या विमानाचा आवाज त्यानं ऐकलाच नव्हता. मग मात्र आम्ही आरडाओरडा करून त्याचं त्या आवाजाकडे लक्ष वेधलं. ते विमान आता अजून जवळ आलं होतं. आकार, आवाज आणि वेगावरून ते एक ‘डाकोटा’ जातीचं विमान आहे हे आमच्या लक्षात आलं. ‘डाकोटा’तली एक वैमानिक, एक सहवैमानिक, एक ‘एअर-सिग्नलर’, एक ‘फ्लाईट-इंजिनीयर’, एक ‘नॅव्हिगेटर’ इ. तंत्रज्ञांची तुकडी आणि इतर १५-२० जण हे त्याक्षणी अक्षरशः देवदूत म्हणून अवतरले होते. संकटकाळी एखादी वडीलधारी, अनुभवी व्यक्ती अनपेक्षितरीत्या मदतीला आल्यावर जसा आधार वाटतो तसं काहीसं आम्हाला वाटलं. आता काय वाट्टेल ते करून आम्ही त्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करणारच होतो...
आमच्या वैमानिकाच्या हालचालींनाही आता निराळ्या तर्‍हेनं वेग आला. विमानाची दिशा सांभाळता सांभाळता त्यानं त्या दुसर्‍या विमानाशी संपर्क साधायची धडपड सुरू केली. सर्वांच्याच सुदैवानं २-३ प्रयत्नांतच त्याला यश आलं आणि आमचा ‘एस्‌-ओ-एस्‌ (सेव्ह अवर सोल)’ चा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला.
डाकोटाच्या वैमानिकानं सर्वात आधी आम्हाला धीर दिला, स्वतःचं विमान जरा वरच्या दिशेला नेऊन उजवीकडे पसरलेल्या ढगाच्या आकाराचा अंदाज घेतला आणि ढगाला वळसा घालून उजव्या बाजूनं आम्ही जाऊ शकू असं आम्हाला कळवलं. जिवात जीव येणं म्हणजे काय ते त्याक्षणी कळलं.
दरम्यान आमच्या सार्जंटच्या चेहर्‍यावर आता निराळीच चिंता दाटून आली होती. ढगाच्या विळख्यातून सुटका करून घ्यायला अजून किमान १५-२० मिनिटं तरी लागणार होती. दिवसभर ‘शटल सर्विस’ करून परतीच्या वाटेला लागलेली आमची एअर-टॅक्सी... तिच्यात आता पुरेसं इंधन शिल्लक असेल की नाही??... पण नशीबानं एव्हाना आमची पुरेशी परिक्षा घेतलेली होती... आमच्या सुटकेच्या मार्गात आता कुठलाही नवीन अडथळा येणार नव्हता... विमानात पुरेसं इंधन शिल्लक होतं!
आम्हाला दिलासा देण्यासाठी डाकोटाच्या वैमानिकानं विमान अगदी खाली आमच्या पातळीपर्यंत आणलं. ढगाची व्याप्ती एव्हाना त्याच्या लक्षात आलीच होती. उजवीकडे वळून त्यानं आम्हाला पाठोपाठ येण्यास सांगितलं. मोठयांचं बोट पकडून निर्धास्तपणे त्यांच्या १-२ पावलं मागून चालणार्‍या लहान मुलांप्रमाणे आम्ही डाकोटाच्या मागेमागे जात राहिलो. ढगाला वळसा घालून आम्ही परत जोरहाटची दिशा पकडेपर्यंत त्यांनी आमची सोबत केली...
जिवावरचं संकट टळलं होतं. डाकोटाच्या मदतीनं ढगाला भेदून पुढे जाण्यात अखेर आम्हाला यश आलं होतं...
ढगात विमान अडकण्याचे प्रसंग तसे अनेकदा यायचे. पण ते इतके गंभीर कधीच नव्हते. खरंतर सैन्यात नोकरी पत्करल्यावर आम्हाला कुणालाही मृत्यूचं भय बाळगण्याचं कारण नव्हतं... पण तो मृत्यू शत्रूशी लढताना येणारा असणार होता; अश्या प्रकारे दुर्दैवी अपघातात सापडून येणारा नव्हे!
दोन सैन्यातली धुमश्चक्री, त्यातला थरार, शस्त्रास्त्र-दारूगोळा यांचा वापर, ती विमानं, सैनिकांच्या त्वरेनं हालचाली, ते एकमेकांना संदेश पाठवणं... हे सगळं सामान्य माणसाला खिळवून ठेवतं. पण या प्रसंगानं हे अधोरेखित केलं की थरार फक्त युध्दकाळातच असतो असं नाही.
तसंही, युध्दकाळ आणि शांततेचा काळ ही विभागणी सामान्यांसाठी असेल पण सैनिकांसाठी मात्र ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...’ हेच वास्तव असतं.
---------------------------------------------------
(माझे सासरे श्री. सदाशिव छत्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)

Sunday, February 14, 2010

ते जीवघेणे काही सेकंद...


१९६२ सालचा ऑगस्ट महिना. सीमेपलिकडून चीनचा हल्ला होणार याची कुणकूण सर्वांना लागलेली होती. तो कुठून होणार, एखाद्या चकमकीपुरतीच त्याची व्याप्ती राहणार की तो सर्वांना युध्दाकडे घेऊन जाणार याचा अंदाज त्यावेळी बांधणं कठीण होतं. पण असा एखादा हल्ला झालाच तर तो थोपवण्यासाठीची शक्य ती सर्व तयारी आपल्या सैन्यानं सुरू केलेली होती.
त्याच दरम्यानची वॉलाँग ए.एल.जी.वरची नेहेमीसारखीच एक व्यस्त सकाळ. विमानं येत-जात होती; जवान, सामान, दारूगोळा यांची ने-आण सुरू होती. सकाळी उठून आपापली आन्हिकं उरकावीत इतक्या सहजतेनं जो-तो नेमून दिलेली कामं उरकत होता.
जोरहाटहून आम्ही अर्ध्या तासापूर्वी निघालो होतो. आता विमानातून वॉलाँगचा तळ दिसायला लागला होता. दोन बाजूंना काटकोनात उंचच्या उंच डोंगर, समोरच्या दोन बाजूंना तश्याच काटकोनांत खोल खोल दर्‍या आणि मधल्या थोड्याश्या सपाट जागेवर तात्पुरता छोटासा बेसकँप... बेसकँपसाठी ही जागा हेरणार्‍या आपल्या सैन्याचं कौतुक करावं तेवढं थोडं होतं. नाहीतर भयप्रद उंचीचे डोंगर आणि जीव दडपवणार्‍या खोल दर्‍यांच्या मधल्या त्या चिमुकल्या पठाराला कधी माणसांचे पाय लागले असते की नाही शंकाच आहे!
तिथून एखादं विमान उड्डाण करताना किंवा उतरताना दुरून कुणी बघत असेल तर त्याच्या पोटात गोळा यावा अशीच तिथली परिस्थिती होती. त्यामुळे या बेसवर आणि एकूणच कुठल्याही ए.एल.जी.वर विमानं आणण्याचं काम नेहेमीच अनुभवी आणि कसलेल्या वैमानिकांवर सोपवलं जाई. आमचा त्यादिवशीचा वैमानिक फ्लाईंग ऑफिसर सहाय हा अश्याच अतिशय कुशल वैमानिकांपैकी एक होता.
बेसकँपच्या पुढ्यातल्या धावपट्टीवर त्यानं आमचं विमान उतरवलं. बरोबर आलेले आर्मीचे जवान, त्यांचं सामान उतरवण्यात आलं. त्यापाठोपाठ सहायबरोबर आम्हीही उतरलो. त्यादिवशी विमान रोजच्यासारखं जोरहाटला परतणार नव्हतं. त्याऐवजी जवानांची अजून एक तुकडी दुसर्‍या एका ए.एल.जी.वर पोहोचवायची होती. त्या तुकडीची निघण्याची तयारी होईपर्यंत बेसवरच्या आर्मीच्या जवानांनी आमचा पाहुणचार करण्याची संधी साधली. त्यांची सरबराई पूर्ण होईपर्यंत पुढच्या तुकडीतले दहा जवान सामानासकट विमानात जाऊन बसलेले होते.
थोड्याच वेळात सहाय विमानात पुन्हा आपल्या जागेवर स्थानापन्न झाला... त्यानं इंजिन चालू केलं... अत्यंत कमी जागेत पण दोनतीन सफाईदार वळणं घेऊन विमान उलटं फिरवून पुन्हा उड्डाणासाठी तयार केलं... नेहेमीच्या तपासण्या करून सर्वकाही ठीकठाक असल्याची खात्री केली आणि विमानाचा वेग वाढवायला सुरूवात केली... विमान धावपट्टीवर पळायला लागलं...
कुठलंही विमान हवेत तरंगत राहण्यासाठी हवेतून कमीतकमी एका विशिष्ट वेगानं जावं लागतं. प्रत्येक विमानाच्या आकार-प्रकाराप्रमाणे हा वेग निरनिराळा असतो. तो सांभाळला तरच त्याचं वजन हवेत व्यवस्थित पेललं जातं. हवेतला हा कमीतकमी वेग मिळवण्यासाठी विमान आधी धावपट्टीवर धावतं आणि पुरेसा वेग मिळाला की हवेत झेपावतं. धावपट्टीची लांबी त्याप्रमाणात पुरेशी असते आणि साधारणतः धावपट्टीच्या निम्म्यापेक्षा जरा कमी अंतरातच विमान उड्डाण करतं...
पण त्यादिवशी आमच्या डोळ्यांसमोर काहीतरी अघटित घडत होतं! रोजच्या सवयीनं किती अंतरावर विमानाचा वेग पुरेसा होणार आणि कुठे विमान वर उचललं जाणार याचा आम्हाला नेमका अंदाज असायचा. पण त्यादिवशी मात्र त्या विशिष्ट वेगात, त्या विशिष्ट अंतरापर्यंत जाऊनसुध्दा विमान हवेत झेपावण्याची चिन्हं दिसेनात. आमच्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. अजून दोनतीन सेकंद गेले तरीही तेच! विमानाची चाकं अजूनही जमिनीवरच होती! ताशी दोनशे कि.मी.च्या वेगानं विमान झपाट्यानं दरीच्या दिशेनं निघालं होतं. आता मात्र आम्ही सगळे गर्भगळीत झालो. अजून काही सेकंद आणि विमान थेट दरीत कोसळणार होतं...
पण... विमान फ्लाईंग ऑफिसर सहायसारख्या ‘दादा’ माणसाच्या ताब्यात होतं. त्यानं ‘इंजिन पॉवर’ तर शून्यावर आणलीच पण अजून एक फार मोठा धोका पत्करून करकचून ब्रेक्स मारले...
मुळात, इतक्या वेगात जाणार्‍या विमानाला जोरदार ब्रेक्स मारणं अत्यंत धोकादायक असतं. चार चाकांवर पळणार्‍या कारलाही शंभर-सव्वाशेच्या वेगात असताना जोरदार ब्रेक्स मारले की काय अवस्था होते ते तुम्ही कधी ना कधी अनुभवलं असेलच. इथे तर दोन चाकांवरचं विमान होतं आणि ती चाकंही एखाद्या दुचाकीप्रमाणे पुढेमागे नाहीत तर शेजारीशेजारी!
वास्तविक, विमानाच्या दोन्ही चाकांना वेगवेगळे ब्रेक्स असतात आणि त्यांचा वापरही मर्यादितच असतो. पार्किंगपासून धावपट्टीपर्यंत ये-जा करताना, विमान वळवताना, जेव्हा विमानाचा वेग अगदी कमी असतो, फक्त तेव्हाच ब्रेक्सचा वापर केला जातो. उड्डाणाच्यावेळी मात्र ब्रेक्सचा वापर करणं अपेक्षित नसतं. कारण ब्रेक-पॅडल्स विमानाच्या सुकाणूला जोडलेली असतात. त्यामुळे दोन्ही चाकांच्या ब्रेकफोर्समध्ये जरा जरी फरक पडला तरी विमान धावपट्टी सोडून एका बाजूला पळायला लागतं. (याला विमान ‘स्विंग’ होणं असं म्हणतात.)... वॉलाँगच्या धावपट्टीच्या आजूबाजूला असं स्विंग व्हायला जागा होतीच कुठे? डावीकडे खोल दरी, उजवीकडे उंच पहाड... विमान डावीकडे स्विंग झालं असतं तर सर्वांचं मरण अटळ होतं; ब्रेक्स मारले नसते तरी समोरच्या दरीत मृत्यू आ वासून उभा होता. पण उजवीकडे स्विंग झालं असतं तर डोंगरावर आपटून विमानाची नासधूस जरी झाली असती तरी जवानांचे प्राण मात्र नक्कीच वाचले असते. आपल्या हातात आयुष्याची दोरी सोपवून निर्धास्तपणे विमानात चढलेल्या त्या दहा जवानांचे प्राण वाचण्याची ही पन्नास टक्के शक्यता गृहित धरून सहायनं करकचून ब्रेक मारण्याचा अत्यंत धाडसी प्रयत्न केला...
सहायच्या कौशल्यानं आणि सर्वांच्याच सुदैवानं विमान स्विंग वगैरे न होता धावपट्टीच्या अगदी टोकाला दरीच्या तोंडाशी जाऊन थांबलं.
काही मिनिटांत सहायनं विमान वळवून माघारी आणलं. भितीनं अर्धमेले झालेले जवान खाली उतरले आणि पाठोपाठ सहायही... रागानं त्याचा चेहरा लालबुंद झाला होता... विमान योग्य वेळी हवेत का झेपावलं नाही याचं कारण त्याला समजलं होतं...
त्यानं विमानात मागच्या बाजूला चढवलेलं सामान तपासलं. जवानांचं म्हणून असं फारसं सामान नव्हतं पण बसायच्या बाकांच्या खाली चटकन्‌ दिसू न शकणारी अशी चार लांबडी खोकी चढवण्यात आली होती. प्रत्येक खोक्यात तोफेची एक-एक नळी होती... प्रत्येक नळीचं वजन सुमारे दोनशे किलो...! म्हणजे जवानांसकट सुमारे दोन टन वजन विमानात लादलं गेलं होतं... ऑटरसारख्या विमानाच्या क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट! त्या आमच्या छोट्याश्या ‘एअरटॅक्सी’ला हा भार कसा पेलवणार? त्या खोक्यांच्या एकत्रित वजनाचा योग्य अंदाज कुणालाच आला नव्हता हे उघड होतं आणि त्यामुळेच ती विमानात चढवली गेली होती.
मुळात, ही खोकी आणि थोड्या सामानानिशी पाच जवान अश्यांनाच घेऊन जायचं होतं. नंतर जागा आहे म्हणून अजून पाच जवान चढले. पण ही छोटीशी चूक किती महागात पडली असती या विचारानं आमच्या जिवाचा थरकाप झाला. केवळ सहायच्या कौशल्यामुळेच हा जीवघेणा अपघात टळला होता...
दुर्दैवानं विमान दरीत कोसळलं असतं तरी ते कश्यामुळे हे कुणालाही कधीच कळलं नसतं. ‘विमानातील तांत्रिक बिघाड’ किंवा ‘वैमानिकाची चूक’ असा सरधोपट शिक्का बसून काही दिवसांतच हा प्रसंग विस्मृतीत गेला असता पण ज्या जवानांनी शत्रूला अस्मान दाखवायचं त्यांना आमच्या एका चुकीमुळे दुर्दैवी मरण आलं असतं या विचारानं आम्ही मात्र पुढे कित्येक दिवस अस्वस्थ होतो!
काम करताना, खास करून ए.एल.जी.वर काम करताना थोडंसुध्दा दुर्लक्ष करून चालणार नाही हा धडा आम्हाला आयुष्यभरासाठी मिळाला...
या प्रसंगानंतर विमानात सामान चढवताना आम्ही जातीनं लक्ष घालायला लागलो. लादल्या जाणार्‍या सामानाचं नेमकं वजन करण्यासाठी आम्ही मुद्दाम ‘स्प्रिंग बॅलन्स’ मागवून घेतले. कारण अंदाज फसवे ठरू शकतात हे सिध्द झालं होतं...
शिवाय, दरवेळेला दैव थोडंच बलवत्तर असणार होतं...
आणि दरवेळी वैमानिकाच्या जागेवर सहाय थोडाच असणार होता...!!

-----------------------------------------------------------

(माझे सासरे श्री. सदाशिव छ्त्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)

Wednesday, February 10, 2010

एक नदी, एक विमान आणि सहाजण


"हॅलो, ‘जे’ बेस, मी जॉलीबॉय बोलतोय. इमर्जन्सी आहे."
"हॅलो, जॉलीबॉय, बोल."
"मी वॉलॉंगहून १२ मिनिटांपूर्वी टेक-ऑफ केलंय. पण माझ्या विमानाचं इंजिन बंद पडलंय. मला ‘फोर्स लँडिंग’ची परवानगी हवी. मी आत्ता ब्रह्मपुत्रेच्या पात्रावरून उडत आहे. मी एकटाच आहे. विमानाची उंची आणि वार्‍याचा वेग पाहता १२-१३ मिनिटे ग्लाईड करू शकेन. कृपया मला परवानगी द्यावी."
"हॅलो, जॉलीबॉय, परवानगी आहे. मन आणि डोकं दोन्ही शांत ठेव. योग्य जागा पाहून सुरक्षितरीत्या लँडिंग कर आणि लगेच रिपोर्ट कर. शुभेच्छा."
... हा निरोप आमच्या युनिटला क्षणार्धात पोहोचला आणि एकच धावपळ सुरू झाली.
हा प्रसंग घडला होता १९६२ सालच्या एप्रिल महिन्यात. त्यानंतर पाचच महिन्यांत चीन आपल्यावर आक्रमण करणार याची पुसटशीही कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती. पण सीमेवर सतत सुसज्ज आणि दक्ष राहण्याचं आपल्या सैन्याचं धोरण असल्यामुळे नेमून दिल्याप्रमाणे सर्वांची कामं चालू होती. मोठ्या विमानांतून ‘जे बेस’वर म्हणजे जोहराट विमानतळावर आलेले जवान, दारूगोळा आणि इतर सामान सीमेवरच्या ‘ऍडव्हान्स लँडिंग ग्राऊंड्स’वर पोहोचवणे आणि तिथून आणणे हे आमच्या युनिटचं मुख्य काम. सीमेलगत थोडासा सपाट प्रदेश पाहून तिथे आमची ‘ऑटर’ विमानं उतरवण्यासाठी लहानलहान ‘ऍडव्हान्स लँडिंग ग्राऊंड्स (ए. एल. जी.)’ तयार केलेली होती. अरुणाचल प्रदेशमधलं वॉलॉंग हे सीमेपासून ६-७ कि.मी.वर असलेलं असंच एक ए. एल. जी. होतं.
आमची विमानं सकाळीसकाळीच अतिदुर्गम भागांतल्या निरनिराळ्या ए. एल. जी.साठी रोजच्याप्रमाणे रवाना झालेली होती आणि साडेदहाच्या सुमाराला वॉलॉंगला सामान पोहोचवून परतताना फ्लाईट ऑफिसर भचु (जॉलीबॉय) याच्या विमानाचं इंजिन बंद पडलं होतं.
वॉलॉंग ते जोहराट हा सर्व मार्ग हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांतून जाणारा. त्यातल्यात्यात मोकळा मार्ग म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाचा भाग. विमानाचं इंजिन बंद पडलं तेव्हा भचु या ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण पात्रावरूनच उडत होता. ‘फोर्स लँडिंग’ची परवानगी तर मिळाली पण विमान नदीच्या पात्रात कसं उतरवणार?... हा प्रश्न त्याक्षणी सगळ्यांच्याच मनात आला. पण आमच्यातली काही अनुभवी मंडळी मात्र निश्चिंत होती. ब्रह्मपुत्रेचं पात्र अतिविस्तीर्ण आहे हे खरंय. पण तेव्हा नदीला पूर नसल्यामुळे संपूर्ण प्रवाह लहानलहान ओढ्यांत विभागला गेलेला होता आणि मध्येमध्ये सपाट वाळवंटं (रिव्हर बेड्स) तयार झालेली होती. त्यांतल्याच एका वाळवंटावर भचु सुखरूप उतरू शकला. १५ मिनिटांत बेसवर तसा त्याचा निरोपही आला. सर्वांनी ‘हुश्श’ केलं. पण खरी परिक्षा पुढेच होती... आणि ती भचुला नाही तर आम्हाला द्यायची होती!
ते विमान परत ‘जे बेस’वर आणायचं म्हणजे तिथे जाऊन एक तर त्याचं बंद पडलेलं इंजिन दुरुस्त करायचं किंवा बदलायचं. त्यांतलं पहिलं काम तुलनेनं सोपं होतं. जोहराटला हेलिकॉप्टरचंही युनिट असल्यामुळे आमचे तंत्रज्ञ, हत्यारं, विमानाचे सुटे भाग तिथे सहज पोहोचू शकत होते. त्याप्रमाणे तंत्रज्ञांची एक तुकडी दुरुस्तीच्या सामानासकट दोन तासांत तिथे पोहोचली. आता प्रतिक्षा होती त्यांच्या ‘रिपोर्ट’ची. पण बरेच प्रयत्न करूनही इंजिन तिथल्यातिथे जाग्यावर दुरुस्त होऊ शकलं नाही. शेवटी ते बदलायचं असं ठरलं. सुमारे एक टन वजनाचं इंजिन आठ-दहा फूट उंचीवरून उतरवायचं आणि दुसरं उचलून त्याजागी बसवायचं म्हणजे एक दिव्यच होतं. पुरेसं मनुष्यबळ आणि सर्व सुविधा हाताशी असतानाही या कामाला साधारणपणे ६-७ तास लागत. आम्हाला मात्र ट्रॉलीज, क्रेन्स इ.च्या मदतीविनाच ते करायचं होतं... ते ही निर्जन अश्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रात! साहजिकच त्यासाठी अचूक नियोजनाची आवश्यकता होती.
आमच्या युनिटमध्ये वेगवेगळ्या शाखांचे तंत्रज्ञ असले तरी युनिट छोटं असल्यामुळे एकमेकांची मदत करावीच लागायची. त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचं जुजबी तांत्रिक ज्ञान आपोआपच झालं होतं. त्यामुळे या कामासाठी एअरफ्रेम, वायरलेस या ट्रेड्सचा प्रत्येकी एकेक इंजिनियर, इलेक्ट्रिकल आणि इन्सटृमेंटचा मी आणि इंजिन ट्रेडचे दोन अशी आमची पाच जणांचीच एक तुकडी एका फिटर सार्जंटच्या नेतृत्वाखाली दहाबारा दिवसांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं तयार झाली. सोबत तिथे राहण्यासाठी तंबू, आमच्या पोटापाण्याची काळजी वाहण्यासाठी एक आचारी आणि त्याचं छोटेखानी स्वयंपाकघर, पुलीब्लॉक, दोरखंड, इतर हत्यारं आणि मुख्य म्हणजे एक नवं कोरं इंजिन या सर्व जामानिम्यानिशी दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे दोन हेलीकॉप्टर्सनी आम्हाला तिथे नेऊन सोडलं. भचुच्या विमानापासून थोडं दूर आणि जरा उंचावर आम्हाला उतरवून, शुभेच्छा देऊन हेलीकॉप्टर्स परत गेली.
भचुनं विमान जिथे उतरवलं होतं तो रिव्हर-बेडचा भाग बर्‍यापैकी मोठा होता आणि जवळचा किनारा अर्ध्या-पाऊण कि.मी.वर होता. सुदैवानं त्या किनार्‍यावर आर्मीचं एक छोटंसं युनिट होतं. इंजिनदुरुस्तीचा प्रयत्न करायला गेलेल्या जवानांनी तिथल्या आर्मीच्या जवानांच्या मदतीनं मोठाले तीनचार दगड आणि वासे आणून त्यांच्या साहाय्यानं विमानाला जखडून ठेवलेलं होतं. आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वीच हत्यारं आणि सुटे भाग विमानातच ठेवून भचुसकट ते सर्वजण जोहराटला परतलेले होते.
तिथे उतरल्याउतरल्या पहिलं म्हणजे अन्न आणि निवारा यांची सोय करणं गरजेचं होतं. त्यामुळे आमचा आचारी लगेच स्वयंपाकाला लागला आणि आम्ही तंबू उभारणीला सुरूवात केली. पण तंबू उभारणीचा अनुभव इथे होता कुणाला? थोडंफार जुजबी ज्ञान जे ट्रेनिंगदरम्यान मिळालं होतं त्याचा मग आम्ही उपयोग करून घेतला. प्राथमिक माहितीच्या आधारानं आम्ही उभारलेला तो तंबू पुढच्या आमच्या तिथल्या संपूर्ण वास्तव्यात जोरदार वार्‍यातही टिकून राहिला हे विशेष! तंबूचं काम पूर्ण करून आचार्‍याच्या हातचं चविष्ट(!) जेवण जेवेपर्यंत दुपारचे दोन वाजून गेले. आता मात्र वेळ दवडून चालणार नव्हतं. उन्हाळ्याची सुरूवात होती; हिमालयातलं बर्फ वितळायला लागलेलं होतं. थोड्याच दिवसांत पूरपरिस्थिती निर्माण होणार होती. ब्रह्मपुत्रा नदीला वर्षातून दोनदा पूर येतो - एकदा पावसाळ्यात आणि एकदा उन्हाळ्यात. पावसाळ्यात पडणार्‍या पावसावरून पुराचा थोडातरी अंदाज बांधता येतो पण उन्हाळ्यात मात्र बघताबघता नदी रौद्र रूप धारण करते! त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचं होतं. आम्ही लगेच कामाला लागलो.
विमान आणि आमचा तंबू यांमध्ये नदीच्या पाण्याचा एक पंधरा ते वीस फूट रुंद ओहोळ होता. विमानापर्यंत पोहोचायचं तर त्या पाण्यातून पलिकडे जावं लागणार होतं. आदल्या दिवशी येऊन गेलेल्यांनी ‘पाणी खूप गार आहे, जरा जपूनच जा’ असा इशारा दिलेला होता. त्याचा विसर पडून मी आपल्या नादातच पुढे सरसावलो. पण त्या ओहोळाच्या मध्यावरच माझे पाय इतके गारठले की पुढे जाताच येईना! हिमालयातल्या वितळलेल्या बर्फाचंच पाणी ते, मग दुसरं काय होणार? शेवटी अजून दोघांनी मला अक्षरशः ओढून पलिकडे नेलं. त्यादिवशी मग काही किरकोळ कामंच होऊ शकली.
दुसर्‍या दिवसापासून मात्र कामाला जोरात सुरूवात झाली. ‘ऑटर’ विमानाचं इंजिन पुढे त्याच्या नाकापाशी असतं जे जमिनीपासून आठदहा फूट उंचीवर असतं. तिथून ते टनभर ओझं उतरवायचं तर त्यासाठी पुलीची आवश्यकता होती आणि पुलीब्लॉक लावण्यासाठी बीम उभारण्याची गरज होती. मग आम्ही किनार्‍यावरच्या जंगलातून जेमतेम वीतभर जाडीची पण पंधरा-सोळा फुटी उंच, सरळसोट अशी लाकडं आणली. विमानाच्या पुढ्यातच तीनतीन खांबांची दोन तिकाटणी उभी केली. त्यावर एक लाकूड आडवं बांधलं आणि त्याला पुली ब्लॉक अडकवला... ही तीनचार वाक्यं नुसती वाचायला किती सोपी नाही? पण पुलीब्लॉक अडकवण्याचं हे एवढं एक काम करायला आम्हाला तब्बल दोन दिवस लागले आणि त्यातलाही अर्धा-अधिक वेळ हा जंगलात शोध घेऊन हवी तशी लाकडं तोडून आणण्यात गेला...! कारण लाकडं तोडण्यासाठी आमच्याकडे फक्त दोनच कुर्‍हाडी होत्या आणि त्यांपैकीही एक लहानच होती...
तिकाटण्यांचे पाय खाली वाळूत खचू नयेत म्हणून २-२ फूट खोल खड्डे खणून जरा घट्ट वाळू लागल्यावर त्यावर दगडगोटे टाकून ते पुरावे लागले. लाकडांवरून दोर घसरू नयेत म्हणून लाकडांवर खाचा पाडाव्या लागल्या. वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कामांनी तिथे आमचा अक्षरशः घाम काढला. पण या आणि अश्या कितीतरी ‘छोट्याछोट्या’(!) कामांत आम्हाला आर्मीच्या जवानांची खूप मदत झाली. त्यांच्यातले दोन जवान तर आमच्या मदतीला कायम दिलेलेच होते.
पुलीची मुख्य सोय तर झालेली होती. पुढचं काम होतं ते म्हणजे विमानाची ५-५ फूट लांबीची आणि प्रत्येकी ६०-६० किलो वजनाची तीन प्रॉपेलर ब्लेड्स खाली उतरवण्याचं! पाचवा दिवस बुडेबुडेपर्यंत ती ब्लेड्स्‌ आणि इतर कनेक्शन्स काढून इंजिन उतरवण्याची पूर्वतयारी आम्ही केली. आता चार बोल्ट्स काढले की इंजिन विमानापासून वेगळं होणार होतं...
सर्वसाधारण परिस्थितीत जे काम एक-दीड दिवसांत झालं असतं त्यासाठी आमचे पाच दिवस मोडले होते. पण तसंही, असाधारण परिस्थितीतच सैन्यातल्या जवानांची खरी कसोटी असते आणि हे काम आमची परिक्षा पाहणार याची कल्पना आम्हाला आधीपासूनच होती!
इंजिन त्या पुलीच्या खाली येईल अश्या रितीनं विमान आम्ही हळुहळू ढकलत आणलं आणि सहाव्या दिवसाच्या कामांना सुरूवात केली. इतरवेळी काँक्रिटवर २-३ माणसंही एका विमानाला सहज ढकलू शकत. पण इथे मात्र आम्हाला त्यासाठी खूपच कष्ट पडले. वाळूमुळे पायांना जोर मिळत नव्हता आणि विमानाची चाकंही वाळूत सहजी पुढे सरकत नव्हती. सर्वांनी अथक प्रयत्न करून विमानाला शेवटी हव्या त्या जागेवर पोहोचवलं. पुलीचा हूक इंजिनला अडकवून हळूहळू ते वजन पेलायला सुरूवात केली. पण इतकी काळजी घेऊनही तिकाटण्याचा एक खांब थोडासा खचतोय असं आमच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा पुलीतून इंजिन सोडवून त्या तिकाटण्याचा पाया अजून भक्कम करावा लागला. मग दुसर्‍या प्रयत्नात मात्र काही अडचण आली नाही. इंजिनाचं पूर्ण एक टन वजन पुलीवर पेलून चारही बोल्ट्स काढून आम्ही इंजिन विमानापासून वेगळं केलं.
एका समस्येवर उपाय शोधून काम पुढे सरकवावं म्हणेपर्यंत पुढची समस्या हजर होती. विमान पुलीपासून पुन्हा थोडं मागे सरकवून इंजिन खाली उतरवण्याची तयारी तर झाली पण इंजिन वाळूत ठेवणार कुठे आणि कसं? कारण ते एक टनी धूड एकदा खाली टेकवलं की पुन्हा तिथून हलवणं कर्मकठीण गेलं असतं... पण आमच्या अनुभवी फिटर सार्जंटनं एक मोकळा इंजिन माऊंटींग बोर्ड आणि चार बोल्ट्स सोबत आणले होते. ‘जे बेस’वर सामान हेलिकॉप्टरमध्ये भरताना ‘आधीच सामान खूप झालंय, त्यात आणखी हा बोर्ड कश्याला, नव्या इंजिनला बोर्ड आहेच की’ वगैरे वगैरे आमचं बोलणं तो गालातल्यागालात हसत ऐकून सोडून का देत होता ते आता आम्हाला कळलं! दोन वासे आडवे ठेवून त्यांच्यावर तो बोर्ड ठेवला आणि ते जडशीळ इंजिन आम्ही कसंबसं उतरवलं. विमान हलवायचं तर त्याला निदान चाकं तरी होती. इंजिन घसटत लांब नेताना मात्र आम्हाला खूपच प्रयास पडले.
सातव्या दिवशी नवीन इंजिन बसवताना या सर्व क्रिया उलटक्रमानं पुन्हा एकदा करायच्या होत्या! त्याप्रमाणे ते इंजिन चार बोल्ट्स्‌च्या साहाय्यानं आपल्या जागेवर स्थानापन्न झालं. त्यावर प्रॉपेलर ब्लेड्स लावताना विशेष काळजी घ्यावी लागली. इंजिनाशी असलेला प्रत्येक ब्लेडचा कोन, त्यांचा आपापसांतला कोन हे सगळं सांभाळणं जरूरीचं होतं. बर्‍याच खटपटीनंतर ते काम पूर्ण झालं. (ब्लेड्स्‌ उतरवताना तुलनेनं सोपं गेलं होतं. कारण तेव्हा हा अलाईनमेंटचा प्रश्न नव्हता.) इतर सामग्री जागच्याजागी बसली आणि आठव्या दिवशी दुपारपर्यंत नवीन इंजिन टेस्टींगसाठी तयार झालं.
आम्ही तिथे उतरल्यापासून आमचा बेसशी संपर्क फक्त वरून जाणार्‍या एखाद्या विमानाद्वारेच होता. (कारण आमचे संदेश फक्त सरळ रेषेतच प्रवास करू शकत.) आमची इतर विमानं मात्र अधूनमधून खूप खालून उडून आमची ‘ख्यालीखुशाली’ पाहत होती. मधूनच बिस्किटाचे पुडे वगैरे आमच्या दिशेनं फेकत होती. तेवढाच आम्हाला दिलासा मिळायचा. दुरुस्ती सुरू असलेल्या विमानातली बॅटरी त्यामुळे तशी जपूनच वापरली गेली होती. तरीही फिटर सार्जंट पायलटच्या जागी विराजमान होऊन त्यानं जेव्हा इंजिन सुरू केलं तेव्हा भकाभक धूर ओकत ३-४ फेरे घेऊन ते पुन्हा बंद पडल्यावर आमचे चेहरे बघण्यासारखे झाले. आता कुठली नवीन समस्या आणि त्यासाठी अजून किती दिवस... ते कळेना! पण पुन्हा एकदा फिटर सार्जंटचा अनुभव कामाला आला. हे असं होणार याची त्याला कल्पना असावी बहुतेक. त्यानं आम्हाला ‘जरा थांबा’ अशी खूण केली. ४-५ सेकंदात इंजिन पुन्हा एकदा चालू झालं आणि आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. इंजिन सिलेंडरमधलं प्रिझर्वेटिव जळून गेल्यावर धूरही जवळजवळ थांबलाच...
नवीन इंजिन व्यवस्थित सुरू झालं, आमची परिक्षा पार पडली! ज्या कामाला दहाबारा दिवस लागतील असं वाटलं होतं ते आम्ही आठ दिवसांतच पूर्ण केलं होतं! सर्वांनाच मोकळंमोकळं वाटलं आणि इतक्या दिवसांत प्रथमच आमचं आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष गेलं. तो एक आगळावेगळा ‘पिकनिक स्पॉट’च वाटला आम्हाला त्यावेळी! एका बाजूला जरा लांबवर दिसणारा किनारा आणि दुसर्‍या बाजूला पार क्षितिजापर्यंत पोहोचलेलं ब्रह्मपुत्रेचं अथांग पात्र! मधूनमधून वाहणारे पाण्याचे प्रवाह, त्यांना दुभंगणारे वाळवंटाचे पट्टे! त्यांतल्याच एका बेटावर आमचा तंबू... जणू विमानानंच आम्ही पिकनिकला आल्यासारखं एका बाजूला ते विमान ‘पार्क’ केलेलं... थंड वारा, सूर्यास्ताची वेळ झालेली, शुक्लपक्ष संपत असल्यामुळे आकाशात चंद्रही दिसायला लागला होता... वाहत्या पाण्याचा मंजूळ आवाज आणि बाकी सगळं निःशब्द! आम्ही ७-८ दिवस तिथे होतो पण त्याआधी यातल्या कश्याचीच जाणीव आम्हाला झाली नव्हती! सगळेजण हे पिकनिक ‘एंजॉय’ करण्याच्या तयारीला लागले! मी मात्र रात्रीचं जेवण झाल्यावर अगदी निवांत, मोकळ्या मनानं चांदण्यात पाय मोकळे करून आलो.
नववा दिवस उजाडला तसे आम्हाला परतीचे वेध लागले. काम पूर्ण झाल्याचं ‘जे बेस’ला कळवलेलं होतंच. दुरुस्त झालेलं विमान परत न्यायचं तर गाडं ‘रन-वे’पाशी अडलं! ब्रह्मपुत्रेच्या भर पात्रातल्या त्या बेटावर ‘रन-वे’ कुठून पैदा करायचा? परिक्षा संपली तरी समस्या संपल्या नव्हत्या! मग जवळच्या आर्मी बेसवरचे मेजर आपल्या १५-२० जवानांसह तिथे आले आणि त्यांनी जमिनीवरची कोरडी वाळू बाजूला करून घट्ट ओल्या वाळूचा एक लांब पट्टा मोकळा केला. झाला आमचा ‘रन-वे’ तयार! इतर सामानाची आवराआवर करून रेल्वेच्या फलाटावर गाडीची वाट पाहत उभं रहावं तसे आम्ही हेलिकॉप्टरची वाट पाहत उभे होतो. जवानांशी गप्पाटप्पाही सुरू होत्या. थोड्याच वेळात हेलिकॉप्टरची घरघर ऐकू आली आणि पाठोपाठ ती उतरलीच. आमचं अभिनंदन करण्यासाठी खास आमचे ‘ऑफिसर-इन-कमांड’ आले होते. बरोबर फ्लाईट ऑफिसर भचुही होता विमान परत नेण्यासाठी.
आमचं सगळं सामान ‘रहने दिजिये साबजी...’ म्हणत आर्मीच्या जवानांनीच हेलिकॉप्टरमध्ये चढवलं. आर्मीच्या जवानांना एअरफोर्सच्या जवानांबद्दल अतीव आदर असतो... कित्येक वेळेला अगदी अवघडून जावं इतका! (‘रन-वे’ तयार करण्यासाठी येतानाही त्यांनी खास आमच्यासाठी म्हणून ‘इस्पेसल नास्ता’ आणला होता!!)...
त्यांना टा-टा करत आणि त्यांचा शिस्तबध्द टा-टा स्वीकारत आमचं हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं.
आमच्यावर सोपवलेली एक फार मोठी जबाबदारी आम्ही यशस्वीरीत्या पार पाडली होती आणि त्यासाठी आम्ही जिथे ७-८ दिवस मुक्काम ठोकला होता त्या आमच्या ‘पिकनिक स्पॉट’कडे आमच्या नजरा पुनःपुन्हा वळत होत्या...
------------------------------------------------------------------------

(माझे सासरे श्री. सदाशिव छ्त्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)
(निवेदनाच्या ओघात या लेखात अनेक तांत्रिक बाबींचा उल्लेख आला आहे. पण त्याविना हे लेखन अर्धवट वाटलं असतं असं मला वाटतं. युध्दप्रसंगी किंवा इतर वेळीही सैन्यातल्या जवानांना किती प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो हे अधोरेखित करणं हा या लेखामागचा मुख्य उद्देश आहे.)
(५९ एल.ए.एस. स्क्वॉड्रन आणि फ्लाईट ऑफिसर भचु यांच्याबद्दल अधिक माहितीhttp://images.google.co.in/imgres?imgurl=http://www.bharat-rakshak.com/I... इथे मिळेल.)

एक काडी जी कधी पेटलीच नाही!


"छत्रे, तुमच्याकडे माचिस आहे का हो? "
आमचे ऍडज्युटंट फ्लाईट लेफ्टनंट भाकेलाल यांच्या या प्रश्नाने मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. वास्तविक ते स्वतः सिगारेट न ओढणारे; मी ओढत नाही हे ही त्यांना ठाऊक होतं. तरीही त्यांनी माझ्याकडे काडेपेटीची मागणी का केली?
"... मला ती लागेल... वेळप्रसंगी विमानाला आग लावून द्यायला... पेट्रोल टाकीचे ड्रेन कॉक्स उघडून पेटती काडी आत टाकली तर विमान लगेच पेट घेईल ना? "
... काडेपेटीची मागणी, ती ही कसल्या भलत्याच कारणासाठी!!
कुठल्याही पायलटचं आपल्या विमानावर किती जिवापाड प्रेम असतं!... त्यालाच आग लावून देण्याचा विचार यांच्या मनात का यावा??
पण माझ्या चेहेर्‍यावरची प्रश्नचिन्हं वाचायला त्यांना सवडच नव्हती. नजर विमानाकडे पण मनात मात्र वेगळेच विचार चालू असणार त्यांच्या... मी अंदाज बांधला. त्यांना काय उत्तर द्यावं ते मला कळेना. पण त्यांचा चिंताग्रस्त चेहेरा पाहून मी गप्पच बसलो. त्यांनाही माझ्याकडून त्वरित उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक.
हा प्रसंग होता १९६२ सालच्या चिनी आक्रमणाच्या वेळचा. माझी नेमणूक त्यावेळी आसाममध्ये जोहराटला झालेली होती. आमच्या ५९-एल. ए. एस. (लॉजिस्टिक एअर सपोर्ट) स्क्वॉड्रनकडे ‘ऑटर’ जातीची विमानं होती. वजनाला हलकी, अगदी फुटबॉलच्या मैदानावरही उतरू शकतील अशी, पायलटसकट दहा जवान घेऊन जाण्याची क्षमता, वेळप्रसंगी आतल्या खुर्च्या दुमडून १ टनापर्यंत सामान नेण्याची किंवा जवानांना पॅराशूटच्या साहाय्यानं खाली उतरवण्याची सोय, गरज पडल्यास आमोरासमोर ‘३ टियर’ पद्धतीनं ६ स्ट्रेचर्स लावून अँब्युलन्ससारखाही उपयोग होणारी अशी ही बहुउद्देशीय विमानं! ‘एअर टॅक्सी’ हे त्या विमानांचं आम्ही ठेवलेलं टोपणनाव सार्थ ठरवणारी.
आमचा बेस-कँप जरी जोहराटला असला तरी एकूण १६ पैकी २-३ विमानंच तिथे असत. बाकीची सगळी २-२ किंवा ३-३ च्या गटांत पुढच्या सेकंड लेव्हल हवाई तळांवर कार्यरत असायची. डाकोटा, पॅकेट, ए एन-१२ सारख्या मोठ्या विमानांतून जोहराटला आलेले जवान आणि त्यांचं सामान त्या पुढच्या हवाई तळांवर नेऊन ठेवणे हे आमचं काम आम्ही त्या ऑटर विमानांच्या मदतीनं पार पाडायचो. तेवढंच नाही तर अगदी पुढे सीमारेषेजवळ फर्स्ट लेव्हल कँपवरही जवान आणि सामान पोहोचवायचं काम असायचं. सेकंड लेव्हल कँपला रस्त्यांमार्गे किंवा विमानांमार्गे जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण फर्स्ट लेव्हल कँपला मात्र फक्त विमानांनीच जावं लागतं. हे काम जास्त अवघड होतं. कारण हा सर्व मार्ग हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांतून जाणारा आहे. ऑटर विमानं बहुउद्देशीय असली तरी त्यांच्या काही मर्यादाही होत्या. त्यामुळे एखाद्या अगदी अरुंद गल्लीतून मोठी कार चालवणं जितकं कठीण तितकंच हिमालयाच्या शिखरांवरून या विमानांमधून प्रवास अवघड होता. पहाटे अगदी सूर्योदयाबरोबरच उड्डाणांना सुरूवात करावी लागे. कारण नंतर हवा जसजशी तापायला लागायची तसे दर्‍यांतून उलटसुलट जोराचे वारे वाहायला लागायचे (एअर टर्ब्युलन्स) आणि विमानं चालवणं अधिकाधिक कठीण होत जायचं. पण आमचे सगळेच पायलट अतिशय कुशल होते. त्यांना सगळ्या मार्गांची अगदी चांगली ओळख होती. त्यामुळे ना कधी कुणी वाट चुकला, ना कुठला अपघात झाला!
त्यादिवशीही आम्ही होतो सेकंड लेव्हल बेस कँपवर. नेहेमीप्रमाणे पहाटेच आम्ही सर्व विमानं उड्डाणांसाठी तयार ठेवली होती. आम्हाला त्या ‘पी बेस’वरून सीमेलगतच्या ‘टी बेस’वर जवानांना पोहोचवायचं होतं. सर्व तयारी होऊनही विमानं उडण्याची चिन्हं दिसेनात... कारण त्या बेसवरच्या आर्मी युनिटचा आमच्याशी असलेला संपर्क तुटला होता. सीमेलगत चिनी आक्रमक पुढेपुढे सरकत होते. आपले जवान तीव्र प्रतिकार करत असूनही त्यांना एक-एक ठाणे सोडून माघार घ्यावी लागत होती...
त्या ‘टी बेस’पासून सीमारेषा तर अवघी ६-७ कि. मी. वर!... काय झालं असेल तिथे?... संपर्क का होत नाहीये?... चिन्यांनी तिथे ताबा तर मिळवला नसेल? देव न करो, पण तसं जर असेल तर मग आपल्या तिथल्या जवानांचं काय?... सगळेच चिंताग्रस्त!
आमच्या कॅप्टननं तर आमच्या बेसचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं २५ कि. मी. वर मोर्चेबांधणीचा निर्णय घेऊन उपलब्ध रस्त्यांमार्गे हालचाल सुरूही केली होती कारण आमचा बेसही सीमारेषेपासून फार काही लांब नव्हता... जेमतेम पन्नास-पंचावन्न कि. मी. अंतर होतं! त्यामुळे पुढच्या ‘टी बेस’वरच्या घडामोडी आम्हाला कळणं अतिशय निकडीचं होतं. संदेशवहनयंत्रणा कोलमडलेली असताना हे कसं काय जमवायचं?
मग आमचे फ्लाईट लेफ्टनंट भाकेलाल यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आमच्या ‘ऑटर’ विमानांमधली संदेशयंत्रणा फक्त सरळ रेषेतच संदेश पोहोचवू शकत असे. त्यांनी ठरवलं की ५-५ मिनिटांच्या अंतरानं तळावर असलेल्या सर्व विमानांनी उड्डाणं करून तिथल्या दर्‍यांतून एक साखळी तयार करायची. प्रत्येक पुढच्या विमानानं मागच्या विमानाला माहिती द्यायची. सर्वात पुढे अर्थातच स्वतः भाकेलाल जाणार होते. पण, ‘टी बेस’ जर दुर्दैवानं चिन्यांच्या ताब्यात असता तर मात्र ते आयतेच त्यांच्या तावडीत सापडले असते. अश्यावेळी एक सुस्थितीतलं विमान तरी शत्रूच्या हाती लागू नये म्हणून वेळ पडल्यास त्याला आग लावून देण्याचा धाडसी विचार त्यांनी केला आणि माझ्याकडे काडेपेटीची मागणी केली...
सर्व पायलट तणावग्रस्त पण निश्चयी मनानं विमानांत चढले. एकापाठोपाठ एक हवेत भरार्‍या घेऊन दिसेनासे झाले. मागे बेसवर आम्ही सर्वजण निःस्तब्ध! आता पुढे काय होणार याची चिंता! साधारण पंधरा मिनिटांनी काहीतरी बातमी कळेल अशी अपेक्षा होती. ती पंधरा मिनिटं आम्हाला पंधरा तासांप्रमाणे वाटली. सगळेजण परत परत घड्याळ्यांकडे पाहत होतो. १५-२० मिनिटे उलटून गेल्यावर तर एकेकाचा धीरच खचायला लागला होता. आणि इतक्यात... भाकेलाल त्या बेसवर सुखरूप पोहोचल्याचा संदेश विमानांच्या साखळीमार्गे आमच्यापर्यंत येऊन पोहोचला! सगळ्यांनी रोखून धरलेले श्वास सोडले!
तिथे सर्वकाही ठीकठाक असल्याची खात्री करून भाकेलाल काही तासांत परतले. आमची त्यादिवशीची पूर्वनियोजित कामं नंतर - २४ तास उशिरानं - पार पडली. तोपर्यंत दोन्ही बेसदरम्यानची संदेशवहनयंत्रणाही सुरळीत झाली होती. नंतर ४-५ दिवसांनी बातमी आली की ‘टी बेस’वर चिन्यांचा हल्ला झाला पण आपल्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. आम्ही वेळेत पाठवलेली कुमक उपयोगी पडली होती... जी आम्ही पाठवू शकलो होतो केवळ भाकेलाल यांनी धोका पत्करून त्वरित हालचाल केल्यामुळेच!!
त्यादिवशी ‘घेणार्‍यांनी’ दोन पेग जरा जास्तच घेतले!
जवानांच्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार येतात. भराभर निर्णय घेऊन चालू क्षणातून मार्ग काढायचा आणि पुढच्या क्षणाला तोंड द्यायला पुन्हा सर्व ताकदीनिशी सज्ज व्हायचं ही सवयच होऊन जाते!
... किंवा करून घ्यावी लागते असं म्हणा हवं तर!

-----------------------------------------------------

(माझे सासरे श्री. सदाशिव छ्त्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)